Thursday, August 15, 2013

सागरा प्राण तळमळला...


सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


!! जयोस्तुते श्रीमहन्मंगले !!


जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

- स्वातंत्र्यवीर सावरकर


Wednesday, August 7, 2013

श्रावणमासी हर्षमानसी..


श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

-बालकवी (श्री. त्र्यंबक बापुजी ठोंबरे)